top of page

आपले घर - आपली माणसे.




माणसांनी भरलेले घर म्हणुया आपण. त्यात 2/3 माणसं जरी असली तरी लोकांच्या मते ते "भरलेले घर " असते. माहेर,सासर, आई, मामी,काकू,बहीण,आत्या, काका,नाना,आजोबा,नणंद,जाऊ,दिर,भाऊजी, भाच्चे मंडळी, मुलं - मुली, लांबचे,जवळचे,सगळे. हे सगळे एकत्र भेटतात ते काही कारणांसाठी. कधी सण समारंभ,कधी सोयर - सुतक,कधी अगदी च सहज म्हणून भेटणं, गप्पा गोष्टी होतात कधी फक्त आपण आणि आपली फॅमिली म्हणजे कुटुंब. कधी दोघांचे कधी च्या पेक्षा अधिक जणांचे. तर हे असे भरले घर असताना हक्काने लोकं सांगतात की कसे आपण एकमेकांसाठी महत्त्वाचे आहोत. प्रत्येकाचं त्या त्या व्यक्तीशी वेगळं नातं असतं आणि त्या नुसार रुसवे फुगवे आणि तक्रारी सुद्धा.

अशा एखाद्या हळव्या क्षणी कुणी तरी आपल्याला बोलते आणि आपल्या वर्मी घाव बसतो. पुरुषाला बऱ्याच प्रकारे निषेध नोंदवत येतो, बायका मात्र अश्यावेळी राग किंवा चिडचिड, अपमान,दुःख हे रडून व्यक्त करतात.

हीच आपली म्हणणारी माणसं "भरल्या घरात रडू नकोस" किंवा "कशाला आमच्या भरल्या घरात रडते आहेस" "भरल्या घरात रडायची दुर्बुद्धी कुठून झाली तुला?" अश्या प्रकारची वाक्य तोंडावर निर्बुद्ध पणें फेकून एका क्षणात आपल्याला "परके आणि पोरके" करून मोकळी होतात. अश्यावेळी जाणीव होते की अरेच्चा!आत्ता आपण कुणाच्या कुणीच नाही आहोत. आत्ता ह्या क्षणी आपण फक्त "ह्यांच्या भरल्या घरात - रडणारी एक व्यक्ती आहोत. माझ्या त्रासाची किंवा अपमानाची, वाईट वाटण्याची ह्यांना सहानुभूती तर सोडाच साधी जाणीव ही नाही.




आपले अश्रू, आपल्या भावना, आपली तक्रार ही ह्या सो कॉल्ड आपलं वाटणाऱ्या लोकांना कळली नाहीच. आपले अश्रू पुसून काय झाले आणि त्यावर काय केले जाऊ शकते , आपल्याला किमान बरे तरी वाटावे म्हणून काय बोलले जावे हे ही ह्या माणसांना कळून समजून येत नाही आणि कळलेच तरी त्यावेळी तसे वागायची इच्छा आणि बुद्धी होत नाही. आपल्या वाईट वाटल्याने कुणाला फरक पडणार नाहीय मात्र आपल्या रडण्याने जणू काही ह्यांच्या भिंतींचा मुलामा निघून जाणार आहे, एकदम घरातून पृथ्वीचा तळ आणि आक्षाचा भाळ च दिसायला लागणार आहे. अश्यावेळी अजून एक अपमानाची ठिणगी मनात पेट घेते आणि "माझ्या भरल्या घरात तुला/तुम्हाला रडवून दाखवीन मग कळेल कसे वाटते ते" अशा एका असुरी इच्छेला जन्म देते आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची भावना न कळत आपल्याला "जे बोलत होते त्यांच्या च रांगेत न कळत नेऊन बसवते. प्रत्येकाला परतफेड करायची असते त्या अन्यायाची,त्या वाक्याची आणि म्हणून प्रत्येकजण आपली वेळ येण्याची वाट पाहत राहतो.






आपणच आपल्यातले कर्ण जागे करतो.

जागा वेगळ्या असतात पण वृत्ती - प्रवृत्ती त्याच!

खरं तर एखाद्या क्षुल्लक गोष्टी साठी, उदाहरणादाखल सुद्धा हे नाव घेणं योग्य होणार नाही पण एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती जेंव्हा एका क्षणी असे काही बोलून जाते की विचार करायला भाग पाडते, कुठे तरी "योग्य"पदाची अयोग्य वागणूक मिळाल्या मुळे अपमानित होते आणि मग तो राग बाहेर पडतो ज्वालामुखी सारखा ; स्फोटक आणि आठवेल त्या प्रत्येक वेळी त्याचे चटके जाणवून देणारा.



दुः शासना........ ही तीच द्रौपदी आहे.....खेच तिला......

काळ धावत राहतो ...... दुःख ओकत राहतो.

ठणकत राहणारी वेदना .... थोपटत राहतो.

ऋतिका

0 comments
bottom of page